पैठण तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा

Foto
गहू, मका, ज्वारी, आंबा, मोसंबीचे नुकसान;शेतकरी हवालदिल
पैठण : पैठण तालुक्यातील विहामांडवा, नवगाव, तुळजापूर, उंचेगाव, चनकवाडी, चांगतपुरी, तेलवाडी या परिसरात शनिवारी व रविवारी अचानक झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली रब्बी पिके जमीनदोस्त होऊन शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे.
शनिवारी रात्री व रविवारी सकाळी पैठण तालुक्यातील वरील गावांना वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने अर्धा तास झोडपून काढले. यामुळे काढणीस आलेला गहू, ज्वारी, मका ही पिके आडवी झाली, तर आंबा व मोसंबीचा बार गळून पडला असल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांवर हे अस्मानी संकट कोसळले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पैठण तालुक्यात अचानक बेमोसमी झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत व शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.


अवकाळीने बळीराजा धास्तावला
औरंगाबाद खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांचे अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागातील रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, मका पिकांना मोठा फटका बसला आहे. आंब्याचेही नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री व रविवारी सकाळी पैठण, फुलंब्री, सिल्‍लोड, गंगापूर, सोयगाव या तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी गारपीटही झाली. कन्‍नड तालुक्यातील देवगाव (रंगारी) गटातील ताडपिंपळगाव, शेवता बोरसर व राजपूतवाडी परिसरात शनिवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीमुळे गहू, हरभरा, मका या रब्बी पिकांचे नुकसान झाले. फुलंब्री तालुक्यातील बाबरा व पाल परिसरात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने अनेक शेतकर्‍यांचे गव्हाचे पीक पूर्ण भुईसपाट झाले.
 यावर्षी निसर्गाने मोठी अवकृपा केली. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली खरी;पण खरिपातील मका, बाजरी, कपाशी या पिकाला कोंब फुटून मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे खरिपाचे पीक हातातून गेले. खरिपात झालेले नुकसान हे रब्बीत भरून निघेल, या आशेवर शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, मका आदी पिकांची लागवड केली. गहू, हरभरा सोंगणीला आला आहे तर, मका पीक हुरड्यात आहे. रब्बी हंगामात चांगले उत्पादन होईल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती;पण अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.